पृष्ठे

शनिवार, ७ जानेवारी, २०२३

सुगी

 


सुगी

     काही दिवसांपूर्वीच इयत्ता तिसरीतील 'सुगी' कविता विद्यार्थ्यांना शिकवली.मध्ये मध्ये शॉर्टफिल्म आम्ही पाहत असल्याने निरीक्षणातून तिसरीतल्या हर्षवर्धनने 'सुगी' कवितेचा व्हिडिओ तयार करू म्हणून सांगितले.

        मुलांच्या कल्पकतेला,त्यांच्या स्वप्नांना बळ द्यायला हवे या मताचा होतो पण वेळच मिळत नव्हता.तो दररोज वा आठवलं की म्हाणायचाच,"सर,आपलं ते शुटिंग केव्हा करायचं?" आधी त्याचा फक्त प्रश्न ऐकून होतो पण परवाच ,"आपण शुटिंग कशी करायची?" हे मुद्दाम त्याला विचारले.

          "हे पहा,आमच्या घराकडे बोरी आहेत.वळणारचे झाड माळीनगर फाट्यावरचं,पेरू आमच्या घरी लागले आहेत.चिंच आपल्या शाळेत आहे नाही तं रस्त्यावर विवेकन त्यांची आहे,हरभरा शेत आमच्या घराच्या मागे आहे आणि शनिवारी आपण शेकोटी करतोच ना...." हर्षवर्धनने हे सारं बोलून दाखवलं होतं.डोक्यात सारं कवितेच्या कडव्यानुसार त्याने फिट्ट करून ठेवलं होतं.त्याचं कौतुक वाटलं.

        त्याच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याची जबाबदारी होती.काल सकाळीच लवकर त्याने सांगितलेल्या ठिकाणांवर शाळेत जातांनांच दणदण शुटिंग केली.शाळेत आल्यावर मुलांना काय करतोय ते सांगताच मुलांनी शेकोटीकरिता कचरा जमा केला.परसबागेतील तुरीच्या शेंगा हर्षवर्धनच्या हातात दिल्या अन् शुट पूर्ण झाले.

     सर्व व्हिडिओ पाहिल्यावर आवाजाची चढ उतार होत असल्याने सर्व कविता आॕडिओत वर्गात गाऊन घेतली अन् झाला 'सुगी' चा प्रवास पूर्ण.

        मुलं विचार करतात.पाहिलेल्या,ऐकलेल्या,हाती असलेल्या साधनांचा उपयोग कसा करावा हे त्याने आज दाखवून दिले होते."असं नाही हो सर,असं करा ना"  असे बारके बारके प्रश्नच त्याचा आत्मविश्वास,त्यातील ज्ञान सांगत होती.मिळवलेल्या तंत्रस्नेही ज्ञानाचा उपयोग करता आला म्हणजे प्रगत तंत्रस्नेही रचनावादी महाराष्ट्र घडायला वेळ लागणार नाही हे निश्चितच..!

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा