पृष्ठे

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

व्हर्च्युअल ट्रीप विथ झुंबा इन माळीनगर व्हाया टाकळी विंचूर

 व्हर्च्युअल ट्रीप विथ झुंबा इन माळीनगर व्हाया विंचुर टाकळी


        आज 'नया कुछ सिखते है' या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी विंचूर ता.येवला येथील प्रयोगशील शिक्षक गजानन उदार यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहावे पुष्प गुंफता आले ते 'व्हर्च्युअल ट्रीप विथ झुंबा इन माळीनगर व्हाया विंचूर टाकळी' थेट झूमसोबतच..!

          झुंबा डान्सने मुलांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी,तो का गरजेचा आहे याची थोडक्यात माहिती देण्यात आली.दोन्हीही शाळेतील विद्यार्थ्यांनी झुंबा डान्स हा खान्देशी गीत 'झुमकावाली पोर' या गाण्यावर केला.वन्स मोअरने पुन्हा एकदा एकत्र घेण्यात आला.यात मुलांनी आनंदाने सहभाग नोंदवला.मजा आली.

        ही व्हर्च्युअल ट्रीप मुलांना आनंद देऊन गेली.मुलांना झुंबाने झालेला आनंद त्यांनी दिलेल्या प्रतिसादावरून कळत होता.चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंदच या उपक्रमाचे महत्त्व पटवून देत होता.दोन शाळांची या व्हर्च्युअल ट्रीपने भेट घडवून आणली.असा संवाद होणं आभासी का असेना होणं महत्त्वाचे आहे.

          औपचारिक शिक्षणाच्या पलिकडचं अनौपचारिक शिक्षण मुलांना हवं असतं,फक्त त्याची बांधणी करतांना तो संबंध औपचारिक शिक्षणाशी सहजच जुळवता आला पाहिजे.शारीरिक शिक्षणातले,कला विषयातील बहुसंख्य बाबी या अशाच सहजच मुलांमध्ये रूजवता येतात.'नया कुछ सिखते है' या नाविन्यपूर्ण उपक्रमातून महाराष्ट्रातील प्रयोगशील शिक्षकांचे प्रयोग,थेट संवाद येथील विद्यार्थ्यांशी होतोय हे खास आहे.येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर मात करून हवं असलेलं मुलांना उपलब्ध होतेय हे भारीच आहे.

       आयोजक मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी विंचूर ता.निफाड जि.नाशिक यांचे या निमित्तानं ऋण व्यक्त करतो.


प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या...!













गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३

झिरो बजेट स्मार्ट पेन

 


माळीनगर टेक्नोसॕवी  विद्यार्थ्यांचा झिरो बजेट टच स्क्रीन पेन

    'गरज ही शोधाची जननी आहे.' असं म्हटलं जातं; ते काही सहजच नाही म्हटलं जात.'टेक्नो आठवडा' सुरू असल्याने नवनवीन बाबी सध्या टॕब कम्प्युटरवर शिकणे सुरू आहे.अन् त्यातच टॕबला टच करून नव नव्या कंमांडवर जाणे यातूनच 'वहीवर चालवतो तसा पेन या टॕबला हवा होता' हे सहजच मनात येऊन गेलं मुलांच्या.अन् योगायोग म्हणजे नॕशनल टेक्नो अवार्डी मित्र सोमनाथ वाळके यांचा त्यावरचा व्हिडिओ एफबीला पाहण्यात आला.

       झिरो बजेटमध्ये टच स्क्रीन पेन तयार करता येईल का? या प्रश्नाचं उत्तर मिळालं.मुलांना टच स्क्रीन पेन तो ही काहीही खर्च न करता तयार करता येईल हे जेव्हा सांगितले तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही.त्याचीच एक लहानशी कार्यशाळा घेऊन टाकली.मुलांनी आवश्यक ते साहित्य आणले.यात कापूस,विजेचा बारीक तार,रिकामा बॉल पेन,थोडे पाणी,टेप होते.दिलेल्या कृतीनुसार मुलांनी आपला स्वतःचा टच स्क्रीन पेन तयार केला अन् विशेष म्हणजे लगेच तो टॕबवर चालवलाही यात मुलांच्या चेहऱ्यावर नवनिर्मितीचा आनंद झाला तो न मोजण्यासारखाच.

"तार नीट लाव?", "पाणी लाव रे.." या वाक्यांपासून सुरू झालेला प्रवास "सर,माझा पेन बघा कसा चालतोय.." या वाक्यावर थांबला.टेक्नोसॕवी पोरांनी आपल्या घरीही हा नवा बिनखर्चिक टच स्क्रीन पेन बनवून दाखवला.आपल्या घरच्या मोबाईलवर चालवून दाखवला.नवा प्रयोग पाहून पालक खुश झालेत.मुलं म्हणाली,

"मला 2-3 पेन बनवून ठेव.बोटांपेक्षा आता पेनच वापरत जाईन मी." असे माझे पप्पा म्हणाले.

"मला पप्पांनी छातीशी लावलं.जीव लावला त्यांनी.कौतुक केलं.."

"मला शाबासकी दिली.." 

असे एक ना अनेक कौतुक सोहळे मुलं सांगत होती.त्यात घरी मोबाईल नव्हता ; म्हणून शाळेत आल्यावर बनवलेला पेन चालतो, की नाही म्हणून यशस्वी प्रयोग करणारा समर्थ तर आलेल्या परिस्थितीचा बाऊ न करता मी येण्याआधीच शाळेच्या टॕबवर आपला पेन चेक केला असं सांगून गालातच हसला.

     विद्यार्थ्यांना नवे ते हवे असते.स्वतः तयार केलेलं जीवापाड जपणारी ही मुलं स्वतः कृती करत शिकली.सोबतीने समृद्ध झाली.प्रयोग यशस्वी झाला की नाही हे स्वतः पडताळून पाहू लागली हे विशेष.सोबत्यांना मोठ्या दिलानं सांगतात हे काही कमी नाही.नुसतं "ज्ञान दिल्याने वाढते" या सुविचाराचा खरा अर्थ यातून मिळत गेला.टेक्नोसॕवी महाराष्ट्रात बदलत्या काळानुसार टेक्नोसॕवी विद्यार्थी घडणंही तितकच महत्त्वाचं आहे.फक्त हवा स्मार्ट मोबाईल,टॕब वा इतर टेक्नो वस्तूंचं स्क्रीन टाइम व्यवस्थापन..!

आपण ही तयार करू शकता असा बिना खर्चिक टच स्क्रीन पेन..!

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३

माहीची चिठ्ठी



 


माहीची चिठ्ठी


     "हर रोज नया कुछ मिल जाता है" अशी परिस्थिती सध्या आहे.पहिलीतली माही जवळ येत म्हणाली,

"सर,मी तुम्हांला चिठ्ठी लिहली आहे." 

     मी थोडा गालात हसलो.कुतूहलाने तिला विचारलं,"कुठं गं ताई."

"दप्तरात आहे नं." एवढं बोलून ती वर्गात पळाली नि दोन वहीची कागदं घेऊन आली.माही तशी हुशार.नीटनेपकेपणा अन् हजरजबाबीपणा असलेली मुलगी.पायरीवर बसल्या बसल्या आणलेला कागद तिला वाचायला लावला.तिनं लिहलं होतं,

'आमचे भरत सर छान आहेत.ते खूप खूप आवडतात.ते छान शिकवतात.भरत सर आम्हांला खूप छान समजावतात.'

       तिचं लिहलेलं तीच वाचत होती अन् मी इकडे तुटत होतो.जिव्हाळा काय असतो पोरांचा तो हाच.तिचं वय अन् तिने मांडलेलं खूप भावलं होतं.तिला विचारपूस करत होतो.असं का लिहलं म्हणून तर म्हणाली,

"तुम्ही आम्हांला सोडून जाशाल ना म्हणून.आम्ही तुम्हाला जाऊ नाही देणार.तुम्ही गेलं तं तुम्हांला याद राहिल ना आमची.." तिचे बोल काळीज कापत होते.पण पडदा टाकावा तसाच तिला जवळ घेत,

"नाही जाणार गं माही." बोललो.

      मागील आठवड्यात घडलेली ही घटना.आज माहीचा वाढदिवस.तिचं आपलेपण नेहमीच भावतं."तुम्ही गेले ते मी पण माझ्या आत्याच्या गावाला शिकायला चालली जाईन मग" अशी हलकीशी धमकीच पोरगी देऊन टाकते.

      बदलीचं जगणं तसं सोपं नाहीच.पहिलीतल्या माहीचं हे काळजातलं पत्र हृदयात खूप खोलवर जाऊन बसलंय.लेकरांना काय हवे नि काय नको याची समज घालण्यासाठी तीच तीच दिली जाणारी उत्तरेही प्रश्न म्हणून माझ्याकडे पाहत असतात.

      माही तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा.खूप मोठी हो..!

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

#माहीचीचिठ्ठी

#बदली

#Malinagar

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३

ॲप्सचं जग

ॲप्सचं जग


 आज इयत्ता 4 थी च्या सर्व मुलांनी एकत्र येत WORD SEARCH MALINAGAR APPS तयार केलंय...!

मुलांमध्ये निश्चितच काहीतरी निर्माण करण्याची क्षमता आहे...! 

❤️माझा विद्यार्थी माझा गौरव ❤️ 

आज त्यांनी नवनिर्माण केलंल स्वतःचं ॲप्स मोबाईलमध्ये आल्यानंतर त्यांना सर्वांना झालेला आनंद काही औरच होता..!

       मुळात ॲप्स तयार करणं आव्हानात्मक आहे.कोडींग असो की रेडी व्यासपीठ असो.ते तयार करतांना लागणारा वेळ महत्त्वाचा असतो.प्रत्येक पायरी समजून घेणं,येणाऱ्या समस्या,काय तयार करायचं,काय काय लागेल?,कुठे उपलब्ध होईल?,त्यासाठी होणारी शोधाशोध,कच्चा डाटा समोर असावा,ॲप्स तयार करतांना लागणारी इमेज,ती ब्लेंड कोलाज वा पेंटला कशी तयार करावी?,साईज कशी घ्यावी,चित्र कोणते घ्यावे.मला काय काय करता येईल? नेट कनेक्टीव्हिटीपासून सारं येतंच प्रत्येक टप्पा महत्त्वाचा असतो यात..पोरांनी सारं समजून घेतलं होतं काल अन् प्रयत्नही केला पण अपयश आलं होतं.आम्ही थांबणार कुठं.पुन्हा कम्प्युटरला तयार करण्याचं ठरलं.एक एक स्टेप पूर्ण करत गेल्यावर झालं एकदाच तयार अन् इमेज आयकाॕन फिटोफिट बसल्यावर राजचे शब्दच पोरांना खळखळून हसवून गेलेत,राज बोलला,

"वा..मा गया" 

        नव्या आव्हानांचा सामना करतांना पोरांना स्क्रीनवर क्यु आर कोड दिसताच.

"सर,क्यु आर कोड आता पाचवीला गेले ते विद्यार्थी बनवत होते.आता आम्ही तयार करू.."

     एका उपक्रमातून दुसऱ्या उपक्रमाचा जन्म होत असतो.फक्त हवा असतो तो पूर्णत्वास नेण्याचा ध्यास.उपक्रमात सातत्य असले की जमते सारे.

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

https://dnyanjoti.blogspot.com/?m=0





गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

तंत्रस्नेही विद्यार्थी अन् त्यांची क्रिएटीव्हिटी

 


तंत्रस्नेही विद्यार्थी अन् त्यांची क्रिएटीव्हिटी...!

      सोबतीने शिकण्यात खूप मजा असते.एकमेकांत होणाऱ्या आंतरक्रिया महत्त्वाच्या असतात.यावेळी चुकणं अन् शिकणं फार महत्त्वाचे असते.या मोबाईल टेक्नोसॕवी जगात 'भान ठेवून बेभान' व्हावं लागणार आहे.नवनव्या अनेक बाबी क्षणाक्षणाला बदलत आहेत.नव्या अभ्यासाशी जुळवून घेतांना अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी अनेक लिंक्स,क्यु आर कोड पाठ्यपुस्तकात वा दैनंदिन जीवनातील अनेक आवश्यक वस्तूत,ठिकाणांवर दिलेले असतात.याबद्दल उत्सुकता असते.पाहिलेली एखादी स्लाईड कशी तयार करावी,ग्रिटींग्ज कसे तयार करावे हे शिकलो आम्ही 'Blend collage' ॲप्सपासून..!

      सोपं सोपं जमलं की अवघड जमतंय हे लक्षातही येत नाही आपल्याला. 'Happy Thursday' पासून सुरूवात झालेला हा प्रवास ब्लेंड कोलाज ॲप्समधील विविध आॕप्शनचा उपयोग मुलांनी समजून घेतला अन् आपल्या आवडीने मुलांनी आपल्या कल्पकतेने ग्रिटींग्ज तयार केले.आपण आपले ई साहित्य तयार करूयात.यात वन टू टेन टाइपलं पोरींनी.चर्चेतून ज्याने त्याने काय तयार करायचे ते वाटून घेतलं.लवकरच तंत्रस्नेही कार्यशाळेतून 'माळीनगर ई साहित्य' तयार होणार.विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले हे साहित्य खास असणार आहे.

        टॕब कमी पडतात म्हणून माझा मोबाईल चेतना व  साक्षी या जोडीला दिला.ग्रिंटिंग्ज पाहून सुखद धक्का बसला.

       मुलं आपल्या कुवतीनं येणारं ज्ञान आपल्या अनुभवावरून एकमेकांत शेअर करतात हे महत्त्वाचे आहे.'शेअर करण' हे खास असतं.

      लहान मुलांना कम्प्युटरवर पेंट शिकवण्यासाठी दुसरीतली तनिष्का पुढाकार घेते हे विशेष आहे.कम्प्युटर सुरू करण्यापासून पेंट शिकवून पुन्हा बंद करणे हे भारीय.पेंटमधील कलर्स,टेक्स्ट,शेप्ससह विविध पर्यायांचा उपयोग करून आपल्या भावंडांना शिकवण्यात तिला छान वाटते.एक एक मुलगा येतो.त्यास माऊस धरायला लावून कृती करून घेणे हे प्रत्येकालाच जमते असे नाही.मुलांच्या चेहऱ्यावर नवे शिकल्याचा अन् कालपेक्षा आज चांगले जमल्याचा आनंद बघण्यासारखा होता.

        तंत्रस्नेही महाराष्ट्रात तंत्रस्नेही साधनांचा उपयोग होणं खूप गरजेचं आहे.यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडते.नवे आपल्यालाच शिकायला मिळते.मुलांच्या कल्पकतेला पंख देण्येच खरं आव्हान आपल्यासमोर आहे.मुलांची भूक प्रचंड असते.यात 'वेळेचे नियोजन' खास असते.बरीच ओढाताण होते पण जुळवून घ्यावं लागतंच..!

      नवे शिकल्याचा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आपल्यासाठी ऊर्जादायी असतो.

प्रेरक आहात ...!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३

शॉर्टफिल्म एक जगणं


 

शॉर्टफिल्म एक जगणं

     मुलांचं जगणं समजून घेता आलं.त्यांची आवड निवड लक्षात आली की ती आपसूकच आपलीशी करता येतात.दुपारचं जेवण झालं की थोडं मुलांचं खेळणं होतच.त्यानंतर थोडा आराम व्हावा,त्यांनी एकत्र बसून गप्पा माराव्यात असं ठरलेलं असतंच त्यांचं.वर्गात गेल्यावर टी.व्ही.पहावी म्हणून मुलांचा गलका एकेदिवशी सभोवती जमला होता.यातूनच मित्रवर्य प्रा.जयराम माळी यांची 'सैर' ही शॉर्टफिल्म पहावी असे ठरले.त्यातूनच आठवड्यातून ४-५ शॉर्टफिल्म अनेक विषयांवर पाहता आल्या.शॉर्टफिल्म बघून झाल्यावर त्यांच्यातील पात्र,काय समजलं,काय आवडलं यावर चर्चा होत राहिली.यातून प्रा.जयराम माळी,निरज देवरे यांच्याशी संवाद साधता आला.अनेक विषयांवर आधारित मराठी,हिंदी,इंग्रजी शॉर्टफिल्म बघता आल्या.

        शॉर्टफिल्म जगतांना पोरं अनेक विषयांवर व्यक्त होतात.त्यांना त्यातून मिळणारा आनंद काही औरच असतो.आपलं जगणं अन् पाहिलेलं जगणं यातलं अंतर त्यांना कळू लागलंय.नैतिक मूल्यांचा विकास यातून साधता येतोय.दररोज स्वच्छता करणं,पक्ष्यांना दाणा पाण्याची सोय करणं,झाडांना पाणी टाकणं,एकमेकांना मदत करणं,सलोखा दाखवणं,परिसरात पडलेली वस्तू परत करणं,मैत्री जोपासणं,चांगलं वाईट कळणं,मोठ्यांचा आदर करणं इ.एक ना अनेक बाबींचा मुलांमध्ये झालेला बदल सुखदायी आहे.शॉर्टफिल्म बघतांना जोराने हसणं,मिस्कील हसणं अन् संवेदनशील विषयाला गंभीर होऊन आपल्या अश्रूंना वाट करून देणं हे सारं बघतांना साहजिकच आपल्या ही डोळ्यांत पाणी उभे राहते.त्यांचं हे शॉर्टफिल्म बघणं निव्वळ बघणं नाहीच ते जगत आहेत.हे वेळोवेळी लक्षात येतंय.

       मागील काळातही अनेक शॉर्टफिल्म पाहिल्या होत्या.आता सातत्याने वेळ मिळेल तशा पुढील शॉर्टफिल्म बघता आल्या.या सर्व शॉर्टफिल्म यु ट्युबवर उपलब्ध असून आपल्यालाही मुलांना दाखवता येतील.


सैर

कोरोना झोन

सारथी

जाणीव

डांबर

ज्योत द फ्लेम

बत्ती

चप्पल

दावं

झळ

हॕपीनेस

काहूर

किल्ले

माझा गाव

निरागस

पतंग

पायताण

रामजू

सवयी

सावित्रीबाई फुले

राजमाता जिजाऊ

स्वामी विवेकानंद

द स्कुल बॕग

द स्टुडन्ट

वही

तिरंगा

भिरं भिरं

शेण

लेझीम

क्यू आर कोड


प्रेरक आहात...!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

असा असतो आमचा दप्तरमुक्त शनिवार

 असा असतो आमचा दप्तरमुक्त शनिवार


शेकोटी

स्वच्छता

झुंबा

कवायत

योगासने

प्राणायम

आनापान - ध्यान

शॉर्टफिल्म

गोष्टींचा शनिवार

सोबतीने वाचन

पुस्तक सखा

खेळ


#malinagar 

#zumba 

#joyful 

#दप्तरमुक्तशनिवार

#NipunBharat 

#SamagraShiksha