पृष्ठे

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३

झिरो बजेट स्मार्ट पेन

 


माळीनगर टेक्नोसॕवी  विद्यार्थ्यांचा झिरो बजेट टच स्क्रीन पेन

    'गरज ही शोधाची जननी आहे.' असं म्हटलं जातं; ते काही सहजच नाही म्हटलं जात.'टेक्नो आठवडा' सुरू असल्याने नवनवीन बाबी सध्या टॕब कम्प्युटरवर शिकणे सुरू आहे.अन् त्यातच टॕबला टच करून नव नव्या कंमांडवर जाणे यातूनच 'वहीवर चालवतो तसा पेन या टॕबला हवा होता' हे सहजच मनात येऊन गेलं मुलांच्या.अन् योगायोग म्हणजे नॕशनल टेक्नो अवार्डी मित्र सोमनाथ वाळके यांचा त्यावरचा व्हिडिओ एफबीला पाहण्यात आला.

       झिरो बजेटमध्ये टच स्क्रीन पेन तयार करता येईल का? या प्रश्नाचं उत्तर मिळालं.मुलांना टच स्क्रीन पेन तो ही काहीही खर्च न करता तयार करता येईल हे जेव्हा सांगितले तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही.त्याचीच एक लहानशी कार्यशाळा घेऊन टाकली.मुलांनी आवश्यक ते साहित्य आणले.यात कापूस,विजेचा बारीक तार,रिकामा बॉल पेन,थोडे पाणी,टेप होते.दिलेल्या कृतीनुसार मुलांनी आपला स्वतःचा टच स्क्रीन पेन तयार केला अन् विशेष म्हणजे लगेच तो टॕबवर चालवलाही यात मुलांच्या चेहऱ्यावर नवनिर्मितीचा आनंद झाला तो न मोजण्यासारखाच.

"तार नीट लाव?", "पाणी लाव रे.." या वाक्यांपासून सुरू झालेला प्रवास "सर,माझा पेन बघा कसा चालतोय.." या वाक्यावर थांबला.टेक्नोसॕवी पोरांनी आपल्या घरीही हा नवा बिनखर्चिक टच स्क्रीन पेन बनवून दाखवला.आपल्या घरच्या मोबाईलवर चालवून दाखवला.नवा प्रयोग पाहून पालक खुश झालेत.मुलं म्हणाली,

"मला 2-3 पेन बनवून ठेव.बोटांपेक्षा आता पेनच वापरत जाईन मी." असे माझे पप्पा म्हणाले.

"मला पप्पांनी छातीशी लावलं.जीव लावला त्यांनी.कौतुक केलं.."

"मला शाबासकी दिली.." 

असे एक ना अनेक कौतुक सोहळे मुलं सांगत होती.त्यात घरी मोबाईल नव्हता ; म्हणून शाळेत आल्यावर बनवलेला पेन चालतो, की नाही म्हणून यशस्वी प्रयोग करणारा समर्थ तर आलेल्या परिस्थितीचा बाऊ न करता मी येण्याआधीच शाळेच्या टॕबवर आपला पेन चेक केला असं सांगून गालातच हसला.

     विद्यार्थ्यांना नवे ते हवे असते.स्वतः तयार केलेलं जीवापाड जपणारी ही मुलं स्वतः कृती करत शिकली.सोबतीने समृद्ध झाली.प्रयोग यशस्वी झाला की नाही हे स्वतः पडताळून पाहू लागली हे विशेष.सोबत्यांना मोठ्या दिलानं सांगतात हे काही कमी नाही.नुसतं "ज्ञान दिल्याने वाढते" या सुविचाराचा खरा अर्थ यातून मिळत गेला.टेक्नोसॕवी महाराष्ट्रात बदलत्या काळानुसार टेक्नोसॕवी विद्यार्थी घडणंही तितकच महत्त्वाचं आहे.फक्त हवा स्मार्ट मोबाईल,टॕब वा इतर टेक्नो वस्तूंचं स्क्रीन टाइम व्यवस्थापन..!

आपण ही तयार करू शकता असा बिना खर्चिक टच स्क्रीन पेन..!

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा