पृष्ठे

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

तंत्रस्नेही रचनामय दिवाळी

 🎉🎊🎇🎆🎉🎊🎇🎆🎉🎊


तंत्रस्नेही रचनावादी दिवाळी

         प्रथम सत्रातला शेवटचा दिवस,दिवाळीच्या लागणाऱ्या सुट्या अन् मुख्याध्यापक बधान सरांचा सेवेचा प्रत्यक्ष शाळा सुरू असतांनाचा शेवटचा दिवस अशा मिश्र स्वरूपात असलेला दिवस जरी असला तरी विद्यार्थ्यांनी मोबाईल,कम्प्युटर,परिसरात असलेली साधने यांचा उपयोग करत,समुहात विभागणी करत रचनामय दिवाळी साजरी केली.

       दिवाळीचा उत्सव माहिती,अक्षरे,शब्दडोंगर,वाक्ये,शब्दसाखळी अशा एक ना अनेक बाबी तोंडी घेत दिवाळीचा उत्साह जागा ठेवला.

       आपणांस व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा..!

🎉🎊🎇🎆🎉🎉🎇🎆🎉🎊






रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

कवी आपल्या भेटीला - राजेंद्र उगले

 कवी आपल्या भेटीला

'थांब ना रे ढगोबा - राजेंद्र उगले'

      दप्तरमुक्त शनिवार आणि मुक्त वाचन माळीनगर शाळेचे ठरलेले उपक्रम.आज मुलांनी आपल्या ग्रंथालयातून पुस्तक काढले होते,बालसाहित्यिक राजेंद्र उगले लिखित 'थांब ना रे ढगोबा' हे बाल कवितांचं पुस्तक.आपल्या आवडीप्रमाणे पुस्तक वाचून झाल्यावर समुहात वाचन या उद्देशाने मुलांनी एकमेकांना या पुस्तकातील कविता वाचून दाखवल्या.गायन केल्या.नव नवे विषय असल्याने त्यांना ते आवडू लागलेही.

          मस्त रंगीत मोठमोठी चित्रे लहानग्यांनाही आकर्षित करत होती.सहज सोप्या रचना त्यांना समजत होत्या.तशातच कवींच्या भेटीला जावं म्हणून मुलांना प्रत्यक्ष कवी राजेंद्र उगले यांच्याशी संपर्क करून दिला.कॉलवर कवी अन् मुलं यात हौणारा संवाद आनंददायी होता.

          मुलांनी यावेळी कवींच्या कविता त्यांना आपल्या सुरात ऐकवल्या.आजचा उपक्रम सांगितला.मुलांशी कवी उगले मनसोक्त बोलले.मुलांच्या आवाजातील कवितांना त्यांनीही दाद दिली. कवितांचा प्रवास,सतत वाचन,लेखनाचा संदेश यावेळी बालसाहित्यिक राजेंद्र उगले यांनी मुलांना दिला.

       ज्यांचं पुस्तक वाचतोय त्यांच्याशी बोलायला भेटलं याचाच आनंद मुलांना फार झाला होता.काही मुलांनी 'थांब ना रे ढगोबा' हा बालकविता संग्रह घरी नेऊन वाचला.एकमेकांना त्याबद्दल सांगितले.हे भारी झालं..!

प्रेरक आहात ..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!



मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२

तंत्रस्नेही रचनावादी दसरा

 तंत्रस्नेही रचनावादी दसरा

दसरा हसरा व्हावा..!
शैक्षणिक दसरा साजरा करता यावा या उद्देशाने माळीनगर शाळेने तंत्रस्नेही रचनावादी दसरा साजरा केला..!

यात दसरा या सणाचे महत्त्व तोंडी घेण्यात आले.चित्र काढणे,रंगवणे,शुभेच्छा,शब्दडोंगर मराठी - इंग्रजी,परिसरातील खडे,पाने,फुले,मातीपासून HAPPY DASARA रचना,कम्प्युटरवर पेंटच्या सहाय्याने ग्रिटींग्ज,मोबाईलवर ब्लेंड कोलाजच्या सहाय्याने ग्रिटींग्ज तयार करणे,दसरा सणाचे स्वागत व नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणून गरबोत्सव साजरा करण्यात आला..!

विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडणाऱ्या गृपमध्ये सामिल होत आपल्या कल्पकतेने तंत्रस्नेही रचनावादी दसरा साजरा केला.

प्रेरक आहात ..!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!





सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

ढगातलं जग

 "ढगातलं जग"


      मधल्या सुट्टीत जेवण झाल्यानंतर वर्गाच्या दिशेने राहिलेली कामे आटपून घ्यावीत म्हणून निघालो.तेवढ्यात कोणीतरी हाताचं बोट पकडल्याचं लक्षात आलं.पाहतो तर पहिलीतली कावेरी होती.

"सर,आरतीभारतीला मारा.ती मला खूप बोलते आहे.मस्त बदडून काढा तिला." कावेरी मस्त गालातल्या गालात हसत हाताच्या बोटांशी खेळत खाली पाहू लागली.

"अरे बापरे! इतकं मारू तिला.अन् ती रडली तर...?" मी तिच्या सुरात सूर मिसळला.

"तुम्ही मारलं ना,मग ती माझं नावच घेणार नाही.तिला बोला तरी ओ सर...पहा ती आली बघा.कशी हसते आहे..." कावेरी जवळच आलेल्या भारतीकडे पाहत बोलू लागली.

     कावेरीचं सहज बोलणं आवडू लागलं होतं.मी काही बोलणार तेवढ्यात भारतीचा हात धरत कावेरीच म्हणाली,

"पाय वं भारती,तो ढग केवढा मोठा से..मजाना धवळा से ना...मस्त वाटी ना वं तेनावर गवूत तं..!"

    भारती ही तिला साद देऊ लागली.आता दोन्हीही आकाशातल्या ढगांचं निरीक्षण करू लागले होते.गप्पागोष्टी रंगत चालल्या पाहून मी ही त्यांच्यात पोहोचलो.

       मुली सहजच निळ्या निळ्या आकाशातल्या ढगांकडे पाहून आपल्या अनुभवातल्या वस्तू,प्राणी शोधू लागल्या होत्या.त्यांच्याशी बोलतोय म्हणून मैदानातली मुलं धावत आली.ती ही माना आकाशाकडे करत त्यांना दिसणारं,जाणवणारं बोलू लागली.ऋषिकेशला वाघ तर हर्षदला गाडी,सार्थकला गणपती दिसू लागला.कुणाला मारामारी करणारे दोन माणसं,अस्वलाचं तोंड असं बरच दिसू लागलं.मुलांचा आता घोळका झाला.

       सारेच निळ्या आकाशातील ढगात आपलं जगणं शोधत होते.आपल्या कल्पकतेने तिथे खेळायला जावं,उड्या माराव्यात,ढगांसोबत गप्पा माराव्यात,पाऊस कसा पडतो ते विचारावं,त्या थेंबासोबत खाली यावं असं मुलांच्या गप्पांतून जाणवत होतं.मुलांच्या सुरात सूर मिसळला गेल्याने मुलं आपल्या कल्पनेचा विस्तार करत होती.आपलं सर ऐकत आहेत म्हणून , "सर,हा ढग पहा.सर,माझा ढग आहे तो.सर,मेंढीचे कसे केस असतात तसे आहे ते..सर,ढगात शाळा भरवायची का?" सहज गप्पा ठोकत होती.

        सहज होणारं शिक्षण पाहून मजा येत होती.निरीक्षणातून मुलाचं अनौपचारिक बोलणं होत होतं.एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्यावर हात ठेवून,डोके जवळ घेऊन आकाशाच्या दिशेने हात करून बोलणारी मुलं कुठलीही भिती न बाळगता बोलत होती.आपलं जग शोधत होती.त्याच्या जगातले नवनवे अनुभव ती मांडत होती.आनंद लुटणारी ही निरागस मुलं ढगातलं जग समजून घेत होती.

         मुलांचं सहज शिक्षण होत होतं.आपल्या भावना ते मांडत होते.मुलं कायम आनंदात असतात आणि ते आनंदात रहायचा प्रयत्न करतात.आपण फक्त निमित्त असतो.मुलाचं शिकणं हे ही असंच सहजच होत असतं.कावेरीचं भारतीविषयीचं मत सहजच कसं निरागसपणे बदललं अन् तिनेच ढगातलं जग आज मुलांना उपलब्ध करून दिलं.आपण फक्त सहजच त्यांचं जग समजून घेतलं आणि योग्य हसून प्रतिसाद दिला तर सारं वातावरणच प्रसन्न होऊन जातं.आनंददायी शिक्षण,सहज शिक्षण वेगळं काय असतं.शिकण्याच्या अनुभवात आनंद असायला हवा म्हणजे नवे मिळणारे अनुभव चांगले लक्षात राहतात.'रम्य ते बालपण' मुलांसोबत रमलं की आपल्यालाही अनुभवता येतं.अगदी मुलात मुल होऊन त्यांच्या मताला थोडा प्रतिसाद दिला तरी न बोलणारी मुलं आपोआप आपल्या विश्वास ठेवत बोलण्याचा प्रयत्न करतात.अनौपचारिक झालेलं आजचं 'ढगातलं जग' औपचारिक शिक्षणाचे वाक्य,शब्दडोंगर,माहिती,रंग,लपलेले शब्द,अक्षरे अशा कितीतरी छोट्या उपक्रमांना तोंडी जन्माला घालून गेले.

          मुलांचं 'ढगातलं जग' काही ऐकू आलं,जाणता आलं,समजता आलं.वर्गाच्या दिशेने जातांना आवारात आपल्या गटानुसार आपलं जग शोधणारी मुलं पाहून आनंद झाला.मुलांचं होणारं सहज शिक्षण आनंद देऊन गेलं होतं.कावेरीला पहावं म्हणून तिला शोधू लागलो.कावेरी अन् भारतीसोबत आता त्यांच्या मैत्रिणीही एकमेकांच्या खांद्यावर हात टेकून आकाशातील ढगांकडे हात दाखवत आपलं जग शोधत होती.एकमेकांना मनमोकळेपणाने हसून दाद देत होती.तिथे जाऊन कावेरीसोबत सेल्फी  घेतला.यशाची अनौपचारिक शिक्षणरूपी गप्पा नावाची नवी चावी आज मिळाली होती.सेल्फी विथ सक्सेसमुळे कावेरीला खूप आनंद झाला.सेल्फी घेतांना कमरेवर हात ठेवून विश्वासाने गळ्यात टाकून आत्मविश्वासाने पोज देणारी कावेरी धावत जाऊन पुन्हा भारतीसोबत ढगातलं जग शोधू लागली.

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!




रविवार, २ ऑक्टोबर, २०२२

व्हर्च्युअल ट्रीप - कोठरे टू माळीनगर

 व्हर्च्युअल ट्रीप -कोठरे टू माळीनगर

       मुलांचं आनंददायी शिक्षण व्हावं, नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षणासाठी करून,मुलांची एकमेकांशी ओळख करून देतांना शैक्षणिक उपक्रमांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक कोठरे व माळीनगर यांनी शैक्षणिक व्हर्च्युअल ट्रीप आयोजित करून मुलांना नवी शैक्षणिक अनुभूती दिली.

        कोठरे येथील उपक्रमशील शिक्षक रवि वाघ यांनी या ट्रीपचे आयोजन केले.माळीनगर शाळेतील विद्यार्थी राबवत असलेले उपक्रम कोठरे येथील विद्यार्थ्यांनी जाणून घेतले तर कोठरे येथील विद्यार्थ्यांचे उपक्रम माळीनगर येथील विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.एकमेकांशी बोलतांना मुलांना होणारा आनंद मुलांचा उत्साह वाढवत होता.कुतूहलाने माळीनगर शाळेची परसबागेची सफर,फुलझाडे यांची ओळख यावेळी करून देण्यात आली.

         शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हर्च्युअल ट्रीपचा अप्रत्यक्ष जरी अनुभव दिला तरी एकमेकांचे उपक्रम जाणून घेता येतात.नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कल्पकतेने करता येतो हे तेवढेच खरंय..!

        विद्यार्थ्यांना झालेला आनंद पाहून शैक्षणिक व्हर्च्युअल ट्रीपचा उद्देश सफल झाला.


प्रेरक आहात..!


प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या