पृष्ठे

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

ढगातलं जग

 "ढगातलं जग"


      मधल्या सुट्टीत जेवण झाल्यानंतर वर्गाच्या दिशेने राहिलेली कामे आटपून घ्यावीत म्हणून निघालो.तेवढ्यात कोणीतरी हाताचं बोट पकडल्याचं लक्षात आलं.पाहतो तर पहिलीतली कावेरी होती.

"सर,आरतीभारतीला मारा.ती मला खूप बोलते आहे.मस्त बदडून काढा तिला." कावेरी मस्त गालातल्या गालात हसत हाताच्या बोटांशी खेळत खाली पाहू लागली.

"अरे बापरे! इतकं मारू तिला.अन् ती रडली तर...?" मी तिच्या सुरात सूर मिसळला.

"तुम्ही मारलं ना,मग ती माझं नावच घेणार नाही.तिला बोला तरी ओ सर...पहा ती आली बघा.कशी हसते आहे..." कावेरी जवळच आलेल्या भारतीकडे पाहत बोलू लागली.

     कावेरीचं सहज बोलणं आवडू लागलं होतं.मी काही बोलणार तेवढ्यात भारतीचा हात धरत कावेरीच म्हणाली,

"पाय वं भारती,तो ढग केवढा मोठा से..मजाना धवळा से ना...मस्त वाटी ना वं तेनावर गवूत तं..!"

    भारती ही तिला साद देऊ लागली.आता दोन्हीही आकाशातल्या ढगांचं निरीक्षण करू लागले होते.गप्पागोष्टी रंगत चालल्या पाहून मी ही त्यांच्यात पोहोचलो.

       मुली सहजच निळ्या निळ्या आकाशातल्या ढगांकडे पाहून आपल्या अनुभवातल्या वस्तू,प्राणी शोधू लागल्या होत्या.त्यांच्याशी बोलतोय म्हणून मैदानातली मुलं धावत आली.ती ही माना आकाशाकडे करत त्यांना दिसणारं,जाणवणारं बोलू लागली.ऋषिकेशला वाघ तर हर्षदला गाडी,सार्थकला गणपती दिसू लागला.कुणाला मारामारी करणारे दोन माणसं,अस्वलाचं तोंड असं बरच दिसू लागलं.मुलांचा आता घोळका झाला.

       सारेच निळ्या आकाशातील ढगात आपलं जगणं शोधत होते.आपल्या कल्पकतेने तिथे खेळायला जावं,उड्या माराव्यात,ढगांसोबत गप्पा माराव्यात,पाऊस कसा पडतो ते विचारावं,त्या थेंबासोबत खाली यावं असं मुलांच्या गप्पांतून जाणवत होतं.मुलांच्या सुरात सूर मिसळला गेल्याने मुलं आपल्या कल्पनेचा विस्तार करत होती.आपलं सर ऐकत आहेत म्हणून , "सर,हा ढग पहा.सर,माझा ढग आहे तो.सर,मेंढीचे कसे केस असतात तसे आहे ते..सर,ढगात शाळा भरवायची का?" सहज गप्पा ठोकत होती.

        सहज होणारं शिक्षण पाहून मजा येत होती.निरीक्षणातून मुलाचं अनौपचारिक बोलणं होत होतं.एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्यावर हात ठेवून,डोके जवळ घेऊन आकाशाच्या दिशेने हात करून बोलणारी मुलं कुठलीही भिती न बाळगता बोलत होती.आपलं जग शोधत होती.त्याच्या जगातले नवनवे अनुभव ती मांडत होती.आनंद लुटणारी ही निरागस मुलं ढगातलं जग समजून घेत होती.

         मुलांचं सहज शिक्षण होत होतं.आपल्या भावना ते मांडत होते.मुलं कायम आनंदात असतात आणि ते आनंदात रहायचा प्रयत्न करतात.आपण फक्त निमित्त असतो.मुलाचं शिकणं हे ही असंच सहजच होत असतं.कावेरीचं भारतीविषयीचं मत सहजच कसं निरागसपणे बदललं अन् तिनेच ढगातलं जग आज मुलांना उपलब्ध करून दिलं.आपण फक्त सहजच त्यांचं जग समजून घेतलं आणि योग्य हसून प्रतिसाद दिला तर सारं वातावरणच प्रसन्न होऊन जातं.आनंददायी शिक्षण,सहज शिक्षण वेगळं काय असतं.शिकण्याच्या अनुभवात आनंद असायला हवा म्हणजे नवे मिळणारे अनुभव चांगले लक्षात राहतात.'रम्य ते बालपण' मुलांसोबत रमलं की आपल्यालाही अनुभवता येतं.अगदी मुलात मुल होऊन त्यांच्या मताला थोडा प्रतिसाद दिला तरी न बोलणारी मुलं आपोआप आपल्या विश्वास ठेवत बोलण्याचा प्रयत्न करतात.अनौपचारिक झालेलं आजचं 'ढगातलं जग' औपचारिक शिक्षणाचे वाक्य,शब्दडोंगर,माहिती,रंग,लपलेले शब्द,अक्षरे अशा कितीतरी छोट्या उपक्रमांना तोंडी जन्माला घालून गेले.

          मुलांचं 'ढगातलं जग' काही ऐकू आलं,जाणता आलं,समजता आलं.वर्गाच्या दिशेने जातांना आवारात आपल्या गटानुसार आपलं जग शोधणारी मुलं पाहून आनंद झाला.मुलांचं होणारं सहज शिक्षण आनंद देऊन गेलं होतं.कावेरीला पहावं म्हणून तिला शोधू लागलो.कावेरी अन् भारतीसोबत आता त्यांच्या मैत्रिणीही एकमेकांच्या खांद्यावर हात टेकून आकाशातील ढगांकडे हात दाखवत आपलं जग शोधत होती.एकमेकांना मनमोकळेपणाने हसून दाद देत होती.तिथे जाऊन कावेरीसोबत सेल्फी  घेतला.यशाची अनौपचारिक शिक्षणरूपी गप्पा नावाची नवी चावी आज मिळाली होती.सेल्फी विथ सक्सेसमुळे कावेरीला खूप आनंद झाला.सेल्फी घेतांना कमरेवर हात ठेवून विश्वासाने गळ्यात टाकून आत्मविश्वासाने पोज देणारी कावेरी धावत जाऊन पुन्हा भारतीसोबत ढगातलं जग शोधू लागली.

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा