पृष्ठे

शनिवार, २८ जानेवारी, २०२३

अहिराणी सचित्र बालमित्र



अहिराणी सचित्र बालमित्र


 "सर,दर शनिवारी तुम्हीच झुंबा घेता.आज आम्ही घेतो."

फरमाईश पूर्ण ..!

आवडले आपल्याला...!

गाणं पूर्ण होताच थकवा निघण्यासाठी बसून गप्पा मारायला सुरूवात झाली.अन् त्यातूनच ..

आपण कोणत्या शारीरिक हालचाली केल्या?

गाण्याचे बोल कोणते?

'गोंडावाली' शब्दात किती अक्षरे आहेत?

'गोंडावाली' या शब्दातील डावीकडून तिसरे अक्षर कोणते?

'गोंडावाली' या शब्दातील 'आ' आकारान्त असलेले अक्षरे किती?

'गोंडावाली' शब्दाची स्पेलिंग तयार करा?

असे एक ना अनेक तोंडी रचनावादी प्रश्न विचारल्यावर सहजच पोरांच्या डोक्यातून भन्नाट कल्पना बाहेर आलीय.

"सर,आपण 'अहिराणी सचित्र बालमित्र' तयार करायचे का?"

त्यात आपण चित्र आणि शब्द आपल्या भाषेतला असावा असे ठरले.त्यात पुढे जाऊन ....

चित्र  - अहिराणी शब्द -  मराठी शब्द - इंग्रजी शब्द असा क्रम ठरला.

'एका उपक्रमातून दुसऱ्या उपक्रमाचा सहजच जन्म होत असतो.'

मुलांच्या कल्पनेला,त्यांच्या शोधकवृत्तीला योग्य व्यासपीठ मिळाले अन् त्यास 'करूयात आपण' असा होकार मिळाल्यास त्यांच्या तोंडून निघणारा "येस" आपल्यातही सकारात्मक ऊर्जा भरून जातो.

सातत्याने दर शनिवारी दप्तरमुक्त शनिवार आणि झुंबा डान्स खान्देशी अहिराणी गीतांसोबत ठरलेला असल्याने त्यातून हा नवा उपक्रम विद्यार्थ्यांना गवसलाय.दिशा देऊयात...पाहूयात काय काय करता येईल..!

प्रेरक आहात...!

"प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या"

गुरुवार, १९ जानेवारी, २०२३

बदली

 


बदली

         पवार सरांचा कॉल झाला.खो बसला हे कळाले.खो बसला म्हणजे मी बदली पात्र असल्याने माझ्या जागेवर नवीन शिक्षकांची नेमणूक आॕनलाईन झाली आणि मला माळीनगर सोडून दुसऱ्या शाळेवर जावे लागेल असे.अखेर 'खो' बसलाच.हे मनाने स्विकारले होते.नोकरी निमित्ताने बदली ही काही कालावधीनंतर होणार असल्यामुळे नवीन असे काही नव्हते,पण हृदयाच्या  कोपऱ्यात तेवढंच दुःखही होत होतं.वर्षाच्या अखेरीस आलेली बदलीची बातमी नव्या पर्वाची नांदी तर होतीच पण गेली अनेक वर्षे 'माळीनगर' शाळा अन् तेथील कुटुंबांशी असलेले संबंध,युवा मित्र असा सारा पसाराच त्या रात्री उशीरापर्यंत डोळ्यासमोरून हलत नव्हता नि झोपही आठवणींच्या सागरात मनसोक्त सुख दुःख अनुभवत होती.

         वीस दिवस झालेत मुलांना कळून की आपल्या सरांची बदली होणार आहे.या दिवसांत अनेक किस्से घडलेत.जे आपल्या असण्याने नि नसण्याने मुलांच्या मनावर काय परिणाम होतो हे जाणून घ्यायला मदत करीत आहेत.

प्रसंग - 1

       साक्षी आणि अविला त्यांच्या घराच्या रस्त्याला सोडावे म्हणून गाडीवर बसवले.रस्त्याने जातांना साक्षी बोलू लागली,

"सर,तुमची बदली होणार आहे नं.मंग तुम्हांला लॕपटॉप,कम्प्युटर जमतंच ना...तुम्ही गुपचूप परत आपल्या माळीनगर शाळेचं नाव टाकून द्या ना..कोणाला समजूच द्यायचं नाही.."

ती दणादण बोलत होती.निरागस मनाला बदली नकोच होती.गप्पा मारत मारत तिला हव्या असलेल्या ठिकाणी उतरविलं.पुन्हा ती बोलली,

"सर,करा बरं तेवढं गुपचूप.."

प्रसंग - 2

        बदलीचा कॉल झाला.थोडा पटांगणात मुलांचं निरीक्षण करत बसलो होतो.तेवढ्यात नवीन पोरांची आणि पहिलीच्या मुलांची गँग झोक्याभोवती जमली.खुदूखुदू हसू लागली.कल्पेशने मनूची हसवण्याची आयडिया सांगितली.आपलं टेन्शन दूर व्हावं म्हणून ही चिमुकली पोरं आपल्याला मानसिक बळ देतात.हे समजणं सोपं नाहीच.

प्रसंग - 3

      आपल्या सरांचा दिवसच आनंदमय करावा आणि आपल्याला खेळण्यासाठी दिलेले फुगे वर्गात सजावट करून 'आनंद द्यावा' या उद्देशाने युवराजने दिलेली युक्ती आचरणात आणणारी पोरं म्हणजे भन्नाटच होती.

प्रसंग - 4

     "सर,उद्याचं जाऊ द्या,तुम्ही आज आहेत ना.मग बस्स..उद्याचं उद्या पाहून घेऊ.आज मस्त लेझीमची प्रॕक्टीस करू..." कोणता आत्मविश्वास हा...आजचं महत्त्व ओळखणारी पिढी घडतंय याचं समाधान मनाला लाभलं.

प्रसंग - 5

     "गुलाबाचं फुल तोडू नका,आमची माळीनगर शाळा सोडू नका" हा सुविचार सांगणारा साई...इतर मुलांचा रोष पत्कारून गेला.त्याला म्हटलं,"आता जावं तं लागेलच भौ.." एवढंच म्हटलं अन् "ह्या,साईला काही काम नाही.काहीही सुविचार सांगतो हा...दुसरा सांगितला असता ना मंग.काय गरज होती..." मुलांचं बोलणं बसतंय हे समजताच साई परत बोलला,

"ओ सर! जाऊ नका तुम्ही.मी हा सुविचारच सांगत नाही.कॕन्सल हा सुविचार.." 

त्याचं बोलणं ऐकताच चेहऱ्यावर हसू ही आलं नि त्याच्या समयसुचकतेचं कौतुक वाटलं.

प्रसंग - 6

      "सर,दररोज बदली,बदली ऐकतोय आम्ही.तुम्हांला आम्ही जाऊच देणार नाही.एका वर्गात बांधून ठेवू आणि आम्हांलाच शिकवायला लावू.त्या बदली वाल्यांना सांगू बाहेरच,आमचे सर नाहीत इथं आसं,तुम्हांला कुठंच जाऊ देणार नाही आम्ही ..?"

        पोरं "बदली" या शब्दानेच बिथरलीत.आपले सर एक दिवस आपल्याला सोडून जातील ही भावनाच नकोशी वाटतेय त्यांना.मुलांना आनंद मिळतोय.'घर आणि शाळा' एकच वाटतेय त्यांना.मनासारखं सारं घडतंय.हवा असलेला अभ्यास होतोय.सारं दिवसभरातलं निरीक्षण करतोय.सायंकाळी शाळा सोडतांना मुलं भोवताली गराडा करतात अन् "उद्या याल ना" हा प्रश्नरुपी चेहऱ्याचं होकाराचं उत्तर घेऊनच ती घरी जातात.

         हे 'बदलीचं जगणं' तसं साधं सोपं नसतंच प्रत्येक शिक्षकाला.दररोज त्यांच्या नव्या प्रश्नांची नव नवी उत्तरे देता येत नाहीत.त्यांना बदली न टळणारी आहे हे समजलंय पण त्यांचे मन हे स्विकारायला तयार नाही.एकदा पालकांना समजवता येतं हो,पण चिमुकल्यांना समजवता नाही येत.पहिल्याच दिवशी जेव्हा त्यांना माहिती पडलं आपले सर आपल्याला सोडून जातील तेव्हा डोळ्यांत अश्रू आणणारी पोरं डोळ्यांसमोरून जातच नाहीत.त्याच दिवशी अलगद बोट पकडून,

"ओ सर,आम्हांला नाही सोडून जायचं बरं.करमणार नाही आम्हांला.." पहिलीतली कावेरी माझ्याकडे हताश नजरेने पाहत बोलत होती.तिचे अलगद हृदयस्पर्शी शब्द कानात सतत ऐकू येतात.हे मुलांचं प्रेम दररोज नव्या रूपात अनुभवत आहे.

प्रेरक आहात ...!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

- भरत पाटील

9665911657

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

पतंगोत्सव

 









पतंगोत्सव 

       सोबतीने समृद्ध होण्यात खूप मजा असते.पतंग बनविण्यासाठी लागणारं साहित्य सोबत आणत आपल्या संवगड्यांना मदत करणारी अन् "याले नको देऊ बरं" असं आपल्या खमक्या आवाजात दमटवणारी लेकरं आज पतंगोत्सवात न्हाऊन निघाली.

        पतंग शॉर्टफिल्म बघत असतांना पतंग मिळविण्यासाठी धडपडणारी मुलं खूप काही शिकवून गेली.'पतंग' शब्द घेत मराठी,इंग्रजी वाक्ये,शब्दडोंगर,शब्दचक्र,शब्दसाखळी,निबंध घेण्यात आला.पतंग बनविण्याची प्रत्यक्ष कृती घेत लागणाऱ्या साहित्याची माहिती थोडक्यात देण्यात आली.

        प्रत्यक्ष कृती करतांना कागद,काड्या,दोरा,डिंक यांची देवाणघेवाण करतांना जॕम मजा आली.एकमेकांना मदत झाली."असं नको करू.असं करं", "अय मन्ह्या काड्या दी टाक बरं तू.नही ते तुनं पतंगच मोडी टाकसू","सर,हाऊ मला घेत नाही" अशी एक ना अनेक गाह्रानी घेऊन येत होती मुलं.हो म्हणत त्यांच्यातच संवाद होऊ दिला.पोरांनी छान अशी पतंग बनवली सोबतीने.एकमेकांना मदत करतांना आपल्या कामात तल्लीन झालेली मुलं हीच तर समाजाचं प्रतिबिंब आपल्यात पाहत असतात.

         प्रत्यक्ष अनुभव घेत पतंग बनवून झाल्यावर मनसोक्त शाळेच्या मैदानावर आपला पतंग आकाशात भिरकवणारी मुलं ही आनंदोत्सव साजरा करू लागली.उडविण्यासाठी परस्परांना मदत करू लागली.आनंदाने पतंगासोबत हितगुज करू लागली.एकमेकांच्या पतंगात पतंग अडकल्यावर कोणी कापत होतं तर कोणी हळूच काढून घेत होती.खेळून झाल्यावर मैदानावर कागदं कागदं झाली.स्वच्छतेचं महत्त्व जाणणाऱ्या या लेकरांनी लगेच कागदं वेचून कचराकुंडीत न सांगता टाकली ही..हे विशेष..!

      आपल्या मनासारखं घडतंय,आपलं ऐकलं जातंय,आपण बनवलेलं भारी होतं,प्रत्यक्ष कृती करू दिली जातेय,साहित्य हाताळता येतंय अशा अनेक बारीकसारीक बाबींचा मानसिक पातळीवर विचार झाल्यानेच पतंगोत्सव आज खास झाला.

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या.प्रेरणा घ्या..!

https://dnyanjoti.blogspot.com/?m=0

गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

अस्सल प्रेम




 

अस्सल प्रेम

       मित्र समाधान अहिरे यांची मुलगी सान्वी हिचा पहिला वाढदिवस काल माळीनगर येथे साजरा झाला.वाढदिवसाचे उरलेले फुगे समाधानने शाळेत मुलांना खेळण्यासाठी शाळेत ठेवलेत असे सांगितले.शाळेत पटांगणातच ते असल्याने साहजिकच पोरं आज राडा करतील अन् पुन्हा त्यांची समजूत काढावी लागेल असं मनोमन घरीच वाटून गेलं.

       शाळेत जाताच मुलं स्वच्छता करत होती.जो तो आपली कामं करत होती.मैदानात एकही फुगा नसल्यामुळे कोणीतरी घेऊन गेले असतील नाहीतर आपल्या पोरांनी फोडले असतील असं वाटून गेलं...!

        पहिल्या इयत्तेतली पटांगणातली पोरं जवळ येऊन लगेच म्हणाली,

"सर,डोळे लावून या वर्गात चालायचं हं,डोळे उघडायचे नाहीत हं." 

मी समजायचं ते समजलो.काही मुलं दरवाजासमोर.काही माझ्या आजूबाजूला.कुणीतरी बोललं,

"सर,खाली वाका ना?"

मी वाकलो.त्याने माझ्या डोळ्यांवर आल्हाद हात ठेवत डोळे बंद केले,पण मागच्या बाजूने बराच वाकल्याने चालता येईना.त्यांना म्हटलं,

"मीच बंद करतो डोळे खरोखर...!"

"नाही हो!तुम्ही उघडून घ्याल ना डोळे" मिस्कील हसत रचू बोलला.

       शेवटी बोली करून डोळे बंद करून दरवाजासमोर उभा राहिलो.मुलं गलका करू लागली.मी उंबरठा पायाला लागू नये म्हणून हळूहळू पाय पुढे टाकू लागलो.मुलं पुढे ढकलू लागली.वर्गात जाताच डोळे उघडले तर चक्क समाधानने दिलेले सर्व फुगे वर्गभर छान रचलेले आढळले.टेबल सजवलेला होता.खूप भारी वाटलं.पोरांना बेंचवर बसवून फोटो घेतला.तेवढयात साक्षी म्हणाली,

"सर,ही आयडिया कोणाची माहिती आहे का?"

"नाही बाई"

"सर,तुमचा विश्वासच बसणार नाही"

"कोण गं ताई"

"युवराज"

"काय बोलते"

        युवराज दुसऱ्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी.वर्गातलं सर्वात आगळंवेगळं व्यक्तीमत्व.निरागसपणे काहीही करून टाकणारा अन् तेवढ्याच हिमतीने मान्य करणारा.कोणी रडलं,नाव सांगायला आलं तरी पुढे येणारं पहिलं नाव म्हणजे युवराजच.खेळणी असो वा काहीही करायला सांगा न भिता पटकन मीच कसा करेल अन् सरांचं बोलणं कसं खाईल यात पुढे असणारा हा गडी.झाडांची निगा,स्वच्छता,मुलांना मदत करण्यात पुढे असणारा,अभ्यासात जेमतेम पण प्रयत्न करणारा हा चौरंगी गडी.त्याने ही आयडिया दिली आणि आम्ही चौघींनी वर्ग सजवला साक्षीने सांगितले.

        मुलांचं निरागस प्रेम हे अस्सल असतं.युवराजचं कौतुक वाटलं,त्याच्यासोबत सेल्फी घेतला.पुन्हा बाहेर येत जवळ घेतलं नि विचारलं.

"युवराज,तुला असं का वाटलं? खेळला असता ना फुग्यांसोबत"

"सर,तुमची बदली झाली तर.तुम्ही आम्हांला कधी भेटाल मंग.वाढदिवसासारखं करा असं साक्षी दिदीला सांगितले."

लहानगा युवराज मैदानातल्या झाडांकडे पाहत नजर चोरत बोलत होता अन् मी ही निरभ्र आकाशात माझं त्यांच्या हृदयातलं स्थान शोधत होतो...!

- भरत पाटील

9665911657

सोमवार, ९ जानेवारी, २०२३

अक्कलकरा औषधी वनस्पती

 





अक्कलकरा औषधी वनस्पती


       माळीनगर शाळेत अनेक औषधी वनस्पतींची लागवड केली गेली आहे.यात अक्कलकारा नावाची औषधी वनस्पती ही नवीनच होती मुलांसाठी पण तिचे बहु उपयोगी गुण विशेष महत्त्वाचे आहेत.एक दोन रोपे आमच्या जळगावच्या साहेबराव बाबांकडून आणले होते.त्यांना बागेची खूप आवड होती अन् नवीनच घर घेतल्याने मलाही नवीन नवीन वनस्पती संग्रह करण्याचा छंद लागला होता.ही अक्कलकरा आयुर्वेदिक वनस्पती त्यांनीच दिली होती.हिचं फुल तोंडात टाकल्यावर होणारी मुखशुद्धी भारीच असते.तिचे उपयोग लक्षात आल्याने शाळेतील परसबागेत तिची लागवड करण्याचे ठरविले.

        शाळेत घरी तयारी केलेली काही रोपे लावली.नवीनच फुले आल्याने तिचे फायदे मुलांना सांगितले.फुल तोंडात टाकल्यावर होणारी जळजळ,जीभ वरवर ओढणे,फेस आल्यासारखे झाल्याने पोरांना खूप मजा आली.दातदुखी,मुखशुद्धी,अपस्मार,जिव्हारोग,मुतखडा,गळ्याचे आजार याने बरे होत असल्याने मुलं आवडीने खिशात घालून खाऊ लागली.तिचे औषधी उपयोग मुलांसह पालकांनिही जाणून घेतले.

         आचार्य बालकृष्णजी यांनी सांगितलेले याचे उपयोग,विकीपिडियावरील माहिती यावरून या अक्कलकराचा उपयोग जाणून घेता येतो,त्याचा उपयोग कसा करता येतो याची माहिती मिळते.

         पवन,गौरव ही जोडी आमची स्पेशल अक्कलकरा रोपे लावण्यापासून त्यांची निगा राखायला पुढेच असते.त्यांनी दुसऱ्यांदा फुलांची तोडणी केली.आलेल्या पाहुण्यांना आम्ही आवर्जून ही फुले भेट देत असतो.आज एक दोन रोपांची शेकडो फुलं आमच्याकडे आहेत.आम्ही विनोदाने म्हणतो ही,"अक्कल येण्यासाठी अक्कलकरा खा." आयुर्वेदिक उपयोग पाहता आपल्याला मदत करायला आम्हांला निश्चितच आवडेल.आपल्याला हवे असल्यास कळवा.संपर्क साधा.

भरत पाटील - 9665911657

अक्कलकराचे औषधी उपयोग पुढील लिंकला पहा.

https://youtu.be/kGdap7iM-Io

प्रेरक आहात ..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

शनिवार, ७ जानेवारी, २०२३

सुगी

 


सुगी

     काही दिवसांपूर्वीच इयत्ता तिसरीतील 'सुगी' कविता विद्यार्थ्यांना शिकवली.मध्ये मध्ये शॉर्टफिल्म आम्ही पाहत असल्याने निरीक्षणातून तिसरीतल्या हर्षवर्धनने 'सुगी' कवितेचा व्हिडिओ तयार करू म्हणून सांगितले.

        मुलांच्या कल्पकतेला,त्यांच्या स्वप्नांना बळ द्यायला हवे या मताचा होतो पण वेळच मिळत नव्हता.तो दररोज वा आठवलं की म्हाणायचाच,"सर,आपलं ते शुटिंग केव्हा करायचं?" आधी त्याचा फक्त प्रश्न ऐकून होतो पण परवाच ,"आपण शुटिंग कशी करायची?" हे मुद्दाम त्याला विचारले.

          "हे पहा,आमच्या घराकडे बोरी आहेत.वळणारचे झाड माळीनगर फाट्यावरचं,पेरू आमच्या घरी लागले आहेत.चिंच आपल्या शाळेत आहे नाही तं रस्त्यावर विवेकन त्यांची आहे,हरभरा शेत आमच्या घराच्या मागे आहे आणि शनिवारी आपण शेकोटी करतोच ना...." हर्षवर्धनने हे सारं बोलून दाखवलं होतं.डोक्यात सारं कवितेच्या कडव्यानुसार त्याने फिट्ट करून ठेवलं होतं.त्याचं कौतुक वाटलं.

        त्याच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याची जबाबदारी होती.काल सकाळीच लवकर त्याने सांगितलेल्या ठिकाणांवर शाळेत जातांनांच दणदण शुटिंग केली.शाळेत आल्यावर मुलांना काय करतोय ते सांगताच मुलांनी शेकोटीकरिता कचरा जमा केला.परसबागेतील तुरीच्या शेंगा हर्षवर्धनच्या हातात दिल्या अन् शुट पूर्ण झाले.

     सर्व व्हिडिओ पाहिल्यावर आवाजाची चढ उतार होत असल्याने सर्व कविता आॕडिओत वर्गात गाऊन घेतली अन् झाला 'सुगी' चा प्रवास पूर्ण.

        मुलं विचार करतात.पाहिलेल्या,ऐकलेल्या,हाती असलेल्या साधनांचा उपयोग कसा करावा हे त्याने आज दाखवून दिले होते."असं नाही हो सर,असं करा ना"  असे बारके बारके प्रश्नच त्याचा आत्मविश्वास,त्यातील ज्ञान सांगत होती.मिळवलेल्या तंत्रस्नेही ज्ञानाचा उपयोग करता आला म्हणजे प्रगत तंत्रस्नेही रचनावादी महाराष्ट्र घडायला वेळ लागणार नाही हे निश्चितच..!

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३

जॉयफुल लर्निंग विथ झुंबा

 


जॉयफुल लर्निंग विथ झुंबा

       दप्तरमुक्त शनिवार असला म्हणजे झुंबा डान्स ठरलेलाच असतो आमचा.तालबद्ध हालचालीचा प्रकार करतांना संगीत सोबतीला असलं म्हणजे शरीर आपोआप थिरकते अन् आपल्या भाषेतलं,आपल्या आवडीचं गाणं असलं की मजाच न्यारी असते यावेळी.संगीतासोबत थिरकतांना उत्साही मन,शरीर यांची योग्य सांगड झाल्याने जीवनाचा वेगळाच आनंद यावेळी अनुभवायला मिळतो.

       झुंबा डान्स तसा एरोबिक्स डान्स प्रकार आहे.यात आपल्याला आवडेल ते संगीत लावून वर्कआऊट केला जातो.यात आम्हीही अहिराणी खान्देशी भाषेतील गीतांचा उपयोग करून पाय,गुडघे,कंबर,हात,खांदे,मान यांच्या योग्य हालचाली घेऊन तालबद्ध व्यायाम करतो.मुलं संगीतासोबत वर्कआऊट करत असल्याने स्नायू बळकट होतात.मानसिक स्वास्थ तंदुरूस्त राहते.आपला रक्तदाब सुधारतो.कॕलरीज बर्न करता येतात.असे अनेक फायदे झुंबा डान्सने होतात.

       आमचा झुंबा डान्स दर आठवड्याला वेगवेगळ्या खान्देशी गीतांसोबत,संगीतासोबत होत असून मुलांना मिळणारा आनंद काही औरच असतो.यात नृत्यातील हालचाली असल्याने ते मनोरंजनात्मक पद्धतीने घेतल्या गेल्याने सर्वच विद्यार्थी यात सहभागी होतात.शरीरात नवी ऊर्जा निर्माण होऊन मुलांच्या मनात उत्साह निर्माण होऊन शाळेविषयी आपुलकी गोडी निर्माण होते.

        विद्यार्थ्यांना फायदे कमी अधिक प्रमाणात माहिती असतील नसतील पण आपल्याला नाचायला,उड्या मारायला,मनासारख्या कृती करायला मिळणार आहेत ना बस्स मग.आनंददायी शिक्षण वेगळं काय असते.शनिवार आपला ही भावना त्यांच्यात निर्माण झाल्यानेच आमची मुलं दर शनिवारी सहजच म्हणतात,

"सर,झुंबा करू ना...नाचो..नाचो ...विथ झुंबा" 

झुंबा डान्सने आज थंडीत झालेलं जॉयफुल लर्निंग स्पेशलच आहे आमच्यासाठी..!

प्रेरक आहात ...!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

मंगळवार, ३ जानेवारी, २०२३

टाकाऊ टायरपासून वाचन कट्टा

 #वाचनकट्टा


#अभ्यासकट्टा

टाकाऊ टायरपासून टिकाऊ वाचनकट्टा..अभ्यासकट्टा..!

 माळीनगर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला पंख कृतीशिलतेचे.अन् याच कृतीशिलतेने माळीनगर शाळेच्या सुशोभिकरणात भर..!

मेहनत रंग लाई..!

नाविनता नेहमीच निरागस मनांना आनंद देते..!

खूप मेहनत केलीय पोरांनी...वाचन कट्ट्यातून हे सुचलंय...पालकांना सांगितली आयडिया..थेट शाळेतच आणून दिले प्रत्येक पालकाने टायर..जे असतील ते.....कुणाच्या घरी जायची गरजच पडली नाही..."सर,तुम्ही आठेच थांबा ..तुम्ही येवाले लागनात की पोरसानं शिकनं थांबी..आम्हीच आठे आनी देतंस..." अभ्यास कट्टा  तयार झालाय...टाकाऊ टायरपासून...जीवन शिक्षण देता येत आहे...तंत्रस्नेही महाराष्ट्रात तंत्रस्नेही रचनावाद माळीनगर शाळेत रूजवला जातोय...!

प्रेरणादायी दखल