पृष्ठे

गुरुवार, १९ जानेवारी, २०२३

बदली

 


बदली

         पवार सरांचा कॉल झाला.खो बसला हे कळाले.खो बसला म्हणजे मी बदली पात्र असल्याने माझ्या जागेवर नवीन शिक्षकांची नेमणूक आॕनलाईन झाली आणि मला माळीनगर सोडून दुसऱ्या शाळेवर जावे लागेल असे.अखेर 'खो' बसलाच.हे मनाने स्विकारले होते.नोकरी निमित्ताने बदली ही काही कालावधीनंतर होणार असल्यामुळे नवीन असे काही नव्हते,पण हृदयाच्या  कोपऱ्यात तेवढंच दुःखही होत होतं.वर्षाच्या अखेरीस आलेली बदलीची बातमी नव्या पर्वाची नांदी तर होतीच पण गेली अनेक वर्षे 'माळीनगर' शाळा अन् तेथील कुटुंबांशी असलेले संबंध,युवा मित्र असा सारा पसाराच त्या रात्री उशीरापर्यंत डोळ्यासमोरून हलत नव्हता नि झोपही आठवणींच्या सागरात मनसोक्त सुख दुःख अनुभवत होती.

         वीस दिवस झालेत मुलांना कळून की आपल्या सरांची बदली होणार आहे.या दिवसांत अनेक किस्से घडलेत.जे आपल्या असण्याने नि नसण्याने मुलांच्या मनावर काय परिणाम होतो हे जाणून घ्यायला मदत करीत आहेत.

प्रसंग - 1

       साक्षी आणि अविला त्यांच्या घराच्या रस्त्याला सोडावे म्हणून गाडीवर बसवले.रस्त्याने जातांना साक्षी बोलू लागली,

"सर,तुमची बदली होणार आहे नं.मंग तुम्हांला लॕपटॉप,कम्प्युटर जमतंच ना...तुम्ही गुपचूप परत आपल्या माळीनगर शाळेचं नाव टाकून द्या ना..कोणाला समजूच द्यायचं नाही.."

ती दणादण बोलत होती.निरागस मनाला बदली नकोच होती.गप्पा मारत मारत तिला हव्या असलेल्या ठिकाणी उतरविलं.पुन्हा ती बोलली,

"सर,करा बरं तेवढं गुपचूप.."

प्रसंग - 2

        बदलीचा कॉल झाला.थोडा पटांगणात मुलांचं निरीक्षण करत बसलो होतो.तेवढ्यात नवीन पोरांची आणि पहिलीच्या मुलांची गँग झोक्याभोवती जमली.खुदूखुदू हसू लागली.कल्पेशने मनूची हसवण्याची आयडिया सांगितली.आपलं टेन्शन दूर व्हावं म्हणून ही चिमुकली पोरं आपल्याला मानसिक बळ देतात.हे समजणं सोपं नाहीच.

प्रसंग - 3

      आपल्या सरांचा दिवसच आनंदमय करावा आणि आपल्याला खेळण्यासाठी दिलेले फुगे वर्गात सजावट करून 'आनंद द्यावा' या उद्देशाने युवराजने दिलेली युक्ती आचरणात आणणारी पोरं म्हणजे भन्नाटच होती.

प्रसंग - 4

     "सर,उद्याचं जाऊ द्या,तुम्ही आज आहेत ना.मग बस्स..उद्याचं उद्या पाहून घेऊ.आज मस्त लेझीमची प्रॕक्टीस करू..." कोणता आत्मविश्वास हा...आजचं महत्त्व ओळखणारी पिढी घडतंय याचं समाधान मनाला लाभलं.

प्रसंग - 5

     "गुलाबाचं फुल तोडू नका,आमची माळीनगर शाळा सोडू नका" हा सुविचार सांगणारा साई...इतर मुलांचा रोष पत्कारून गेला.त्याला म्हटलं,"आता जावं तं लागेलच भौ.." एवढंच म्हटलं अन् "ह्या,साईला काही काम नाही.काहीही सुविचार सांगतो हा...दुसरा सांगितला असता ना मंग.काय गरज होती..." मुलांचं बोलणं बसतंय हे समजताच साई परत बोलला,

"ओ सर! जाऊ नका तुम्ही.मी हा सुविचारच सांगत नाही.कॕन्सल हा सुविचार.." 

त्याचं बोलणं ऐकताच चेहऱ्यावर हसू ही आलं नि त्याच्या समयसुचकतेचं कौतुक वाटलं.

प्रसंग - 6

      "सर,दररोज बदली,बदली ऐकतोय आम्ही.तुम्हांला आम्ही जाऊच देणार नाही.एका वर्गात बांधून ठेवू आणि आम्हांलाच शिकवायला लावू.त्या बदली वाल्यांना सांगू बाहेरच,आमचे सर नाहीत इथं आसं,तुम्हांला कुठंच जाऊ देणार नाही आम्ही ..?"

        पोरं "बदली" या शब्दानेच बिथरलीत.आपले सर एक दिवस आपल्याला सोडून जातील ही भावनाच नकोशी वाटतेय त्यांना.मुलांना आनंद मिळतोय.'घर आणि शाळा' एकच वाटतेय त्यांना.मनासारखं सारं घडतंय.हवा असलेला अभ्यास होतोय.सारं दिवसभरातलं निरीक्षण करतोय.सायंकाळी शाळा सोडतांना मुलं भोवताली गराडा करतात अन् "उद्या याल ना" हा प्रश्नरुपी चेहऱ्याचं होकाराचं उत्तर घेऊनच ती घरी जातात.

         हे 'बदलीचं जगणं' तसं साधं सोपं नसतंच प्रत्येक शिक्षकाला.दररोज त्यांच्या नव्या प्रश्नांची नव नवी उत्तरे देता येत नाहीत.त्यांना बदली न टळणारी आहे हे समजलंय पण त्यांचे मन हे स्विकारायला तयार नाही.एकदा पालकांना समजवता येतं हो,पण चिमुकल्यांना समजवता नाही येत.पहिल्याच दिवशी जेव्हा त्यांना माहिती पडलं आपले सर आपल्याला सोडून जातील तेव्हा डोळ्यांत अश्रू आणणारी पोरं डोळ्यांसमोरून जातच नाहीत.त्याच दिवशी अलगद बोट पकडून,

"ओ सर,आम्हांला नाही सोडून जायचं बरं.करमणार नाही आम्हांला.." पहिलीतली कावेरी माझ्याकडे हताश नजरेने पाहत बोलत होती.तिचे अलगद हृदयस्पर्शी शब्द कानात सतत ऐकू येतात.हे मुलांचं प्रेम दररोज नव्या रूपात अनुभवत आहे.

प्रेरक आहात ...!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

- भरत पाटील

9665911657

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा