पृष्ठे

गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

अस्सल प्रेम




 

अस्सल प्रेम

       मित्र समाधान अहिरे यांची मुलगी सान्वी हिचा पहिला वाढदिवस काल माळीनगर येथे साजरा झाला.वाढदिवसाचे उरलेले फुगे समाधानने शाळेत मुलांना खेळण्यासाठी शाळेत ठेवलेत असे सांगितले.शाळेत पटांगणातच ते असल्याने साहजिकच पोरं आज राडा करतील अन् पुन्हा त्यांची समजूत काढावी लागेल असं मनोमन घरीच वाटून गेलं.

       शाळेत जाताच मुलं स्वच्छता करत होती.जो तो आपली कामं करत होती.मैदानात एकही फुगा नसल्यामुळे कोणीतरी घेऊन गेले असतील नाहीतर आपल्या पोरांनी फोडले असतील असं वाटून गेलं...!

        पहिल्या इयत्तेतली पटांगणातली पोरं जवळ येऊन लगेच म्हणाली,

"सर,डोळे लावून या वर्गात चालायचं हं,डोळे उघडायचे नाहीत हं." 

मी समजायचं ते समजलो.काही मुलं दरवाजासमोर.काही माझ्या आजूबाजूला.कुणीतरी बोललं,

"सर,खाली वाका ना?"

मी वाकलो.त्याने माझ्या डोळ्यांवर आल्हाद हात ठेवत डोळे बंद केले,पण मागच्या बाजूने बराच वाकल्याने चालता येईना.त्यांना म्हटलं,

"मीच बंद करतो डोळे खरोखर...!"

"नाही हो!तुम्ही उघडून घ्याल ना डोळे" मिस्कील हसत रचू बोलला.

       शेवटी बोली करून डोळे बंद करून दरवाजासमोर उभा राहिलो.मुलं गलका करू लागली.मी उंबरठा पायाला लागू नये म्हणून हळूहळू पाय पुढे टाकू लागलो.मुलं पुढे ढकलू लागली.वर्गात जाताच डोळे उघडले तर चक्क समाधानने दिलेले सर्व फुगे वर्गभर छान रचलेले आढळले.टेबल सजवलेला होता.खूप भारी वाटलं.पोरांना बेंचवर बसवून फोटो घेतला.तेवढयात साक्षी म्हणाली,

"सर,ही आयडिया कोणाची माहिती आहे का?"

"नाही बाई"

"सर,तुमचा विश्वासच बसणार नाही"

"कोण गं ताई"

"युवराज"

"काय बोलते"

        युवराज दुसऱ्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी.वर्गातलं सर्वात आगळंवेगळं व्यक्तीमत्व.निरागसपणे काहीही करून टाकणारा अन् तेवढ्याच हिमतीने मान्य करणारा.कोणी रडलं,नाव सांगायला आलं तरी पुढे येणारं पहिलं नाव म्हणजे युवराजच.खेळणी असो वा काहीही करायला सांगा न भिता पटकन मीच कसा करेल अन् सरांचं बोलणं कसं खाईल यात पुढे असणारा हा गडी.झाडांची निगा,स्वच्छता,मुलांना मदत करण्यात पुढे असणारा,अभ्यासात जेमतेम पण प्रयत्न करणारा हा चौरंगी गडी.त्याने ही आयडिया दिली आणि आम्ही चौघींनी वर्ग सजवला साक्षीने सांगितले.

        मुलांचं निरागस प्रेम हे अस्सल असतं.युवराजचं कौतुक वाटलं,त्याच्यासोबत सेल्फी घेतला.पुन्हा बाहेर येत जवळ घेतलं नि विचारलं.

"युवराज,तुला असं का वाटलं? खेळला असता ना फुग्यांसोबत"

"सर,तुमची बदली झाली तर.तुम्ही आम्हांला कधी भेटाल मंग.वाढदिवसासारखं करा असं साक्षी दिदीला सांगितले."

लहानगा युवराज मैदानातल्या झाडांकडे पाहत नजर चोरत बोलत होता अन् मी ही निरभ्र आकाशात माझं त्यांच्या हृदयातलं स्थान शोधत होतो...!

- भरत पाटील

9665911657

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा