पृष्ठे

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

अंकुर

 
                    

अंकुर

       "सर,जामाचं रोप आणलंय,लावा ना शाळेमागे?" स्मित करत पहिलीतला कल्पेश हातातलं रोप दाखवत रस्त्याने जाणाऱ्या टु व्हीलर गाडीकडे पाहत बोलत होता.मी त्याच्याकडे बघत होतो.निरागस भाव अन् आपलं म्हणणं मांडण्याचं त्याचं कौशल्य भावलं.

         पहिलीतला कल्पेश अगदी लाजाळू अन् मितभाषी.आपल्या जगात वावरणारा.आज अगदी न लाजता शाळेत भरताच जवळ येत आत्मविश्वासाने आपलं हातातलं रोप दाखवत बोलून गेला.हातातलं जामचं रोप अन् त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून लगेचच त्यानं आणलेलं रोप लावून घ्यावं असं वाटलं.त्याचं नुसतं जवळ येणंच काही दिवसांपासून होणाऱ्या अनौपचारिक गप्पांचा परिणाम होता हे जाणवलं.मोठ्या मुलांना सोबत घेत शाळेमागे जातांना कल्पेशला विचारलं,

"कपू! का आणलं रं रोप ?"

"शाळा भारी होईल ना आपली.मस्त सावली भेटेल.जाम खायला भेटतील आपल्याला म्हणून .." कल्पेश बोलत होता.

        कल्पेशचे लहानसे बोल शैक्षणिक वाट सुकर करत होते.त्याच्या हृदयातून फुटलेले हे शब्दरुपी अंकुर जपणं गरजेचं होतं.मुलांना सोबत घेऊन शाळेमागे त्याच्या हाताने रोप लावलं.मुलांना एकत्र करत त्याच्या या कृतीचं कौतुक केलं.टाळ्या वाजवणाऱ्या मुलांकडे पाहत आपण काहीतरी वेगळं केलंय याची जाणीव त्याला झाली.खाली बसल्यावर कल्पेश आपल्या मित्राला म्हणाला,

"पाह्यं का? कशा टाळ्या वाजण्यात म्हनाकरता.तु पन एखादं झाडं आनजो घरून.आपली शाळा हिरवीगार हुयी जायी मंगन.."

       कल्पेशचा संवाद नवी जाणीव निर्माण करत होता.शाळेत झाडे लावा मोहिम असो की हँगिंग गार्डन मोहिम असो मुलांना सोबत घेऊन आम्ही प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देत असतो.यात श्रमप्रतिष्ठा,निसर्ग शिक्षण,पर्यावरण शिक्षण,मूल्यशिक्षण,जीवन कौशल्यांची रूजवणूक नित्याने होत असते.मोठी भावंडं कशी काम करतात,झाडे लावतात,रोपं आणतात,खत घालतात,झाडांची काळजी घेतात याचंच निरीक्षण कल्पेश करत होता.आपणही आपल्या शाळेसाठी खारीचा वाटा उचलावा असं त्याला वाटून गेलं असावं.तीन एच म्हणजे हँन्ड,हार्ट,हेडचा उपयोग करून घेणारी माळीनगर शाळा आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नेहमीच अग्रेसर असते.मुलं अनुकरणातून शिकत असतात.आपल्याला काहीतरी करायचंय,शिकायचंय ही भावनाच मुलांमध्ये निर्माण करण्यावर आमचा भर असतो.निसर्गात मुलं अधिक शिकतात आणि येथेच ती संवेदनशील होतात यावर विश्वास असल्याने पर्यावरणीय शिक्षण हे प्रत्यक्ष अनुभवातून येथे दिलं जातं असतं.मुलांच्या अंकुररुपी कल्पनेला,कृतीला वाव देण्याचं काम नेहमीच करत असल्याने मुलं न घाबरता आपल्या मनात आलेल्या कल्पनेला सांगत असतात.

         मुल लहान असो की मोठे त्याच्याजवळ शहाणपण अन् वास्तवतेचे भान असते.मुलाला योग्यवेळी समज आल्यावर तो जबाबदारीने वागतो अन् जबाबदारी घ्यायलाही शिकतो.हे कल्पेशच्या कृतीने सिद्ध केले होते.मुलं ही जणू मोठी माणसेच असतात.हे ते करत असलेल्या कृतीतून आणि निरीक्षणातून आपल्याला नेहमीच जाणवत असते.खरं शिक्षण हे शिकवण्यात नाही,तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात असणाऱ्या अनौपचारिक नात्यातून बहरतं.हे तेवढंच खरंय.कल्पेशने आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचं उपयोजन केलं होतं.म्हणूनच तर शिक्षणतज्ज्ञ नील म्हणतो,"मुलाप्रमाणे शाळेने बदलायचे.मुलांना शिकायचेच असेल,तर ती कोणत्याही पद्धतीने शिकतात आणि जर त्यांना शिकायचेच नसेल तर ती शिकतच नाहीत."

         चला तर मग..! मुलांच्या विचारांचा आदर करत शिक्षण प्रवाहाचा गुणवत्तापूर्ण संवेदनशील मनांचा अंकुर जपूयात..!

- भरत विठ्ठल पाटील
9665911657
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगर 
ता.मालेगाव जि.नाशिक 
bharatpatil7988@gmail.com



क्रीडा सप्ताह

 माळीनगर शाळेत क्रीडा सप्ताह संपन्न


खेळाने मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती वाढते : समाधान अहिरे

प्रेरणा अभियान अंतर्गत माळीनगर दुंधे शाळेत क्रीडा सप्ताह हा राबवला गेला.आदिवासी विकास पुणे येथील स्वीय सहाय्यक समाधान अहिरे यांच्या हस्ते याचा समारोप करण्यात आला.शालेय वयात भरपूर खेळा.आवडीचा खेळ हा छंद म्हणून जोपासा त्यामुळे आपली एकाग्रता तर वाढतेच पण आपल्यात खिलाडूवृत्तीही जोपासली जाते.खेळानेच मानसिक आणि शारीरिक तंदुरूस्ती लाभते असे यावेळी अहिरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.


        शाळा स्तरावर विविध स्पर्धा आयोजित करून मुलांचं खेळातून शिक्षण व्हावं,खेळाविषयी आवड निर्माण व्हावी,खेळाचं अनुकूल वातावरण तयार व्हावं,मुलांना शाळेविषयी आकर्षण निर्माण व्हावं म्हणून हा क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात आला होता.यात लिंबू चमचा,गोणपाट स्पर्धा,धावणे,लंगडी,संगीत खुर्ची,क्रिकेट,फुगा खेळ,क्रिकेट,कबड्डी,कुस्ती,कॕरम,योगा,विविध विषयांचे माईंड  गेम  खेळवण्यात आले.विशेष मुलांच्या स्थानिक खेळानांही प्राधान्य देण्यात आले होते.यामुळे मुलांमध्ये नवा उत्साह व नवीन खेळ खेळल्याचा आनंद पहावयास मिळत होता.यावेळी विद्यार्थ्यांमध्ये असलेला आत्मविश्वास,इच्छाशक्ती,उत्साह व मेहनत दिसून आली.


       हा क्रीडा सप्ताह यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक राजेंद्र बधान व उपक्रमशील शिक्षक भरत पाटील,शाळा व्यवस्थापन समिती,पालकांनी बहुमोल योगदान दिले.