पृष्ठे

बुधवार, १४ डिसेंबर, २०२२

श्रमदान हेच श्रेष्ठदान




 श्रमदान हेच श्रेष्ठदान 

      गाडीच्या डिक्कीतला गेरू म्हणजे हिरमुंजीची 2 किलोची पॕकिंग बाजूला ठेवली.दुपारच्या सुट्टीत पाणी भरलेल्या बादलीत गेरू मिसळला अन् सुरूवात केली झाडांना द्यायला.चौथीची मुलं सकाळपासूनच निरीक्षण करत होती.सभोवती जमली.

"ओ सर,आम्ही देतो ना रंग.तुम्ही नका देऊ.." करण बोलला.

"सर,जाऊ द्या.किचनमध्ये आजून एक ब्रश आहे.तुम्ही पण द्या आम्ही पण देतो." राज शक्कल लढवत बोलला.

त्यात समर्थ,यश,मयुरही आपापली मतं सांगत होती.

      पोरांनी सोबतीने श्रमदान करण्यास सुरूवात केली.झाडांना कीड लागू नये व सुशोभित शाळा दिसावी म्हणून प्रवास सुरू झाला होता.त्यात परिसरात पडलेल्या दगडांना झाडांभोवती लावून रंग देण्याची आयडिया पोरांच्या डोक्यात आली.पहिलीपासून चौथीपर्यंतच्या मुलांनी परिसरातील लहान मोठी दगडी झाडांभोवती लावली.तिसरीच्या मुलांनी झाडांना खत दिले अन् चौथीच्या मुलांनी झाडांना,दगडांना रंग दिला.दररोज काही वेळ श्रमदान केल्याने काही दिवसातच हाती घेतलेले काम पूर्ण झाले.मुलांच्या सोबतीने शाळेचे बाह्यांग रूप बदललेय.ती बोलकी झालीय.लावलेली झाडं भाव खाताय.

       मुलांच्या कल्पकतेचं स्वागत झालं अन् शाळा नटलीय.श्रमदानाचं महत्त्व यानिमित्तानं पटवून देता आले.

      'गुणवत्ता हेच प्राथमिक लक्ष्य' ठेवल्याने सारे जमून येतेय.प्रयत्न सुरू आहेत लेकरांच्या मदतीने.

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!



शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

शेकोटी गप्पा

 






शेकोटी गप्पा

      शाळेत अनौपचारिक शिक्षण खूप महत्वाचे असते.औपचारिक शिक्षणाला फाटा देत दप्तरमुक्त शनिवार अन् सुरू असलेला गुलाबी थंडीचा हिवाळा ऋतू आल्हाददायकच असतो सर्वांसाठी.सकाळी सकाळी भेटलेली मुलं जीवनाला रंग भरून जातात.

       आज मुलांशी गप्पा झाल्यात.शेकोटी,वाजणारी थंडी त्यात अधूनमधून कचरा गोळा करून आणणारी मुलं गुलाबी थंडीची ऊब देत होते.मुलांशी कुटुंब,शेती,मामाचं गाव,शेती,डोंगर,नद्या,शाळा या विषयावर जिकडे गप्पांचा कल जाईल तिकडे गप्पा सुरू ठेवल्या.आपल्या जगातल्या गोष्टी मुलं मोठी माणसं बनून सांगतात जेव्हा त्यांचं कुणी ऐकणारं असतं.

कधी कधी आपणही 'कान' व्हावं मुलांचा...!

       "सर! आपलं ऐकतात." ही भावनाच मुलांना आपलंस करण्यात मोलाची भूमिका निभावून जात असते.अनौपचारिक शेकोटी गप्पांतून न बोलणारी,मागे राहणारी मुलं आपला मार्ग काढत आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करतातच अन् येथूनच खरी शिक्षण वाट सुरू होते त्यांची.

       नव नवे शालेय उपयुक्त उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्याचा मुळातच उद्देश तो असतो,की शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाला शिक्षण प्रवाहात आणून,तो टिकवून त्यास गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे होय.माळीनगर शाळा सातत्याने तेच करत आलीय अन् करत राहणार.कारण शाळेत येणारं प्रत्येक मुलं महत्त्वाचं आहे.

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!