पृष्ठे

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

पतंगोत्सव

 









पतंगोत्सव 

       सोबतीने समृद्ध होण्यात खूप मजा असते.पतंग बनविण्यासाठी लागणारं साहित्य सोबत आणत आपल्या संवगड्यांना मदत करणारी अन् "याले नको देऊ बरं" असं आपल्या खमक्या आवाजात दमटवणारी लेकरं आज पतंगोत्सवात न्हाऊन निघाली.

        पतंग शॉर्टफिल्म बघत असतांना पतंग मिळविण्यासाठी धडपडणारी मुलं खूप काही शिकवून गेली.'पतंग' शब्द घेत मराठी,इंग्रजी वाक्ये,शब्दडोंगर,शब्दचक्र,शब्दसाखळी,निबंध घेण्यात आला.पतंग बनविण्याची प्रत्यक्ष कृती घेत लागणाऱ्या साहित्याची माहिती थोडक्यात देण्यात आली.

        प्रत्यक्ष कृती करतांना कागद,काड्या,दोरा,डिंक यांची देवाणघेवाण करतांना जॕम मजा आली.एकमेकांना मदत झाली."असं नको करू.असं करं", "अय मन्ह्या काड्या दी टाक बरं तू.नही ते तुनं पतंगच मोडी टाकसू","सर,हाऊ मला घेत नाही" अशी एक ना अनेक गाह्रानी घेऊन येत होती मुलं.हो म्हणत त्यांच्यातच संवाद होऊ दिला.पोरांनी छान अशी पतंग बनवली सोबतीने.एकमेकांना मदत करतांना आपल्या कामात तल्लीन झालेली मुलं हीच तर समाजाचं प्रतिबिंब आपल्यात पाहत असतात.

         प्रत्यक्ष अनुभव घेत पतंग बनवून झाल्यावर मनसोक्त शाळेच्या मैदानावर आपला पतंग आकाशात भिरकवणारी मुलं ही आनंदोत्सव साजरा करू लागली.उडविण्यासाठी परस्परांना मदत करू लागली.आनंदाने पतंगासोबत हितगुज करू लागली.एकमेकांच्या पतंगात पतंग अडकल्यावर कोणी कापत होतं तर कोणी हळूच काढून घेत होती.खेळून झाल्यावर मैदानावर कागदं कागदं झाली.स्वच्छतेचं महत्त्व जाणणाऱ्या या लेकरांनी लगेच कागदं वेचून कचराकुंडीत न सांगता टाकली ही..हे विशेष..!

      आपल्या मनासारखं घडतंय,आपलं ऐकलं जातंय,आपण बनवलेलं भारी होतं,प्रत्यक्ष कृती करू दिली जातेय,साहित्य हाताळता येतंय अशा अनेक बारीकसारीक बाबींचा मानसिक पातळीवर विचार झाल्यानेच पतंगोत्सव आज खास झाला.

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या.प्रेरणा घ्या..!

https://dnyanjoti.blogspot.com/?m=0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा