माहीची चिठ्ठी
"हर रोज नया कुछ मिल जाता है" अशी परिस्थिती सध्या आहे.पहिलीतली माही जवळ येत म्हणाली,
"सर,मी तुम्हांला चिठ्ठी लिहली आहे."
मी थोडा गालात हसलो.कुतूहलाने तिला विचारलं,"कुठं गं ताई."
"दप्तरात आहे नं." एवढं बोलून ती वर्गात पळाली नि दोन वहीची कागदं घेऊन आली.माही तशी हुशार.नीटनेपकेपणा अन् हजरजबाबीपणा असलेली मुलगी.पायरीवर बसल्या बसल्या आणलेला कागद तिला वाचायला लावला.तिनं लिहलं होतं,
'आमचे भरत सर छान आहेत.ते खूप खूप आवडतात.ते छान शिकवतात.भरत सर आम्हांला खूप छान समजावतात.'
तिचं लिहलेलं तीच वाचत होती अन् मी इकडे तुटत होतो.जिव्हाळा काय असतो पोरांचा तो हाच.तिचं वय अन् तिने मांडलेलं खूप भावलं होतं.तिला विचारपूस करत होतो.असं का लिहलं म्हणून तर म्हणाली,
"तुम्ही आम्हांला सोडून जाशाल ना म्हणून.आम्ही तुम्हाला जाऊ नाही देणार.तुम्ही गेलं तं तुम्हांला याद राहिल ना आमची.." तिचे बोल काळीज कापत होते.पण पडदा टाकावा तसाच तिला जवळ घेत,
"नाही जाणार गं माही." बोललो.
मागील आठवड्यात घडलेली ही घटना.आज माहीचा वाढदिवस.तिचं आपलेपण नेहमीच भावतं."तुम्ही गेले ते मी पण माझ्या आत्याच्या गावाला शिकायला चालली जाईन मग" अशी हलकीशी धमकीच पोरगी देऊन टाकते.
बदलीचं जगणं तसं सोपं नाहीच.पहिलीतल्या माहीचं हे काळजातलं पत्र हृदयात खूप खोलवर जाऊन बसलंय.लेकरांना काय हवे नि काय नको याची समज घालण्यासाठी तीच तीच दिली जाणारी उत्तरेही प्रश्न म्हणून माझ्याकडे पाहत असतात.
माही तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा.खूप मोठी हो..!
प्रेरक आहात..!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!
#माहीचीचिठ्ठी
#बदली
#Malinagar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा