श्रमदान हेच श्रेष्ठदान
गाडीच्या डिक्कीतला गेरू म्हणजे हिरमुंजीची 2 किलोची पॕकिंग बाजूला ठेवली.दुपारच्या सुट्टीत पाणी भरलेल्या बादलीत गेरू मिसळला अन् सुरूवात केली झाडांना द्यायला.चौथीची मुलं सकाळपासूनच निरीक्षण करत होती.सभोवती जमली.
"ओ सर,आम्ही देतो ना रंग.तुम्ही नका देऊ.." करण बोलला.
"सर,जाऊ द्या.किचनमध्ये आजून एक ब्रश आहे.तुम्ही पण द्या आम्ही पण देतो." राज शक्कल लढवत बोलला.
त्यात समर्थ,यश,मयुरही आपापली मतं सांगत होती.
पोरांनी सोबतीने श्रमदान करण्यास सुरूवात केली.झाडांना कीड लागू नये व सुशोभित शाळा दिसावी म्हणून प्रवास सुरू झाला होता.त्यात परिसरात पडलेल्या दगडांना झाडांभोवती लावून रंग देण्याची आयडिया पोरांच्या डोक्यात आली.पहिलीपासून चौथीपर्यंतच्या मुलांनी परिसरातील लहान मोठी दगडी झाडांभोवती लावली.तिसरीच्या मुलांनी झाडांना खत दिले अन् चौथीच्या मुलांनी झाडांना,दगडांना रंग दिला.दररोज काही वेळ श्रमदान केल्याने काही दिवसातच हाती घेतलेले काम पूर्ण झाले.मुलांच्या सोबतीने शाळेचे बाह्यांग रूप बदललेय.ती बोलकी झालीय.लावलेली झाडं भाव खाताय.
मुलांच्या कल्पकतेचं स्वागत झालं अन् शाळा नटलीय.श्रमदानाचं महत्त्व यानिमित्तानं पटवून देता आले.
'गुणवत्ता हेच प्राथमिक लक्ष्य' ठेवल्याने सारे जमून येतेय.प्रयत्न सुरू आहेत लेकरांच्या मदतीने.
प्रेरक आहात..!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!